रत्नागिरीत मृत्यूचे कारण शोधण्यासाठी होणार ‘डेथ ऑडिट’

रत्नागिरी:- कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण अधिक राहिले आहे. त्यातही तरुण रुग्णांचा मृत्यू अधिक आहे. याची कारणे शोधण्यासाठी या सर्व मृत्यूंचे पृथक्करण (डेथ ऑडिट) करण्याचा निर्णय कोविड-१९ जिल्हा कृतिदलाच्या (टास्क फोर्स) बैठकीत घेण्यात आला. 

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात झालेल्या मृत्यूंमधील २५ जणांच्या मृत्यूबाबत नेमकी लक्षणे, कारणे तसेच सहव्याधी (कोमॉर्बिड) आदींचा अभ्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने करण्यात येणार आहे. यासाठी आदेश २२ जूनला जारी करण्यात आले. नेमकेपणाने संशोधन करून भविष्यातील रुग्णांचा उपचार करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा भाग म्हणून या पृथक्करणास महत्व राहणार आहे.

जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर याबाबत अभ्यास करून आपला अहवाल जिल्हा टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना सादर करतील, असे या आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १ हजार ६६७ जणांचा मृ्त्यू झाला आहे. हा मृत्यूदर २.८५ टक्क्यांवर आहे. प्रशासन अनेक प्रयत्न करीत आहे; मात्र मृत्यूदर काही कमी येत नाही. म्हणून टास्क फोर्सच्या बैठकीत मृत्यूचे कारण शोधण्यासाठी डेथ ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.