रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील खालची आळी येथे देवदर्शन करुन चालत जाणाऱ्या वृध्दाला तीन भामट्यांनी लुटले. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार गिरीधर दत्तात्रय साखरकर (73, मारुतीमंदिर, सोहम अपार्टमेंट, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीधर साखरकर हे भैरी मंदिरातून देवदर्शन करुन दुपारच्या सुमारास केळकर यांच्या घरासमोरील रस्त्याने चालत जात असताना तीन अज्ञात इसमांनी आपण पोलीस असल्याचे सांगितले. सोन्याच्या दोन अंगठ्या हातातून काढून ठेवा असे सांगितले. ते सगळे दागिने कागदाच्या पुडीत बांधून पिशवीमध्ये टाकल्याचे भासवले. त्यानंतर साखरकर यांनी पिशवीतील पुडी उघडून पाहिली असता पिशवीमध्ये खडे असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तकार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात 3 चोरटयांवर भादविकलम 420, 170, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.