रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गांजा विक्रीला आळा
घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. जेलरोड, कोकणनगर, शिरगाव अशा ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या कारवाईने गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पहिल्या घटनेत मच्छिमार्केट ते जेलरोड जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.०० वाजता करण्यात आली. याप्रकरणी नरमोहम्मद दिलमोहम्मद खान (वय २४) याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत शहरातील कोकणनगर शिवरेवाडी येथील आंब्याच्या बागेत एका आंब्याच्या झाडाच्या आडोशाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी किरण रामचंद्र कदम (वय २२) याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव शेट्येवाडी येथे महालक्ष्मी मेडिकलच्या पाठीमागे भिंतीच्या आडोशाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई १९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.४० वाजता करण्यात आली. याप्रकरणी शब्बीरअली शहानवाझ पटेल (वय २८) आणि शफाकत हसन आदम राजपरकर (वय ३६) यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शांताराम रामचंद्र झोरे (वय ४८) यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी क्रमांक १ शब्बीरअली पटेल आणि आरोपी क्रमांक २ शफाकत राजपरकर हे शिरगाव शेट्येवाडी येथे महालक्ष्मी मेडिकलच्या पाठीमागे एका भिंतीच्या आडोशाला बसून बेकायदेशीरपणे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असताना मिळून आले.
याप्रकरणी कोकण नगर येथील 1, शिरगावमधील 2 आणि जेलरोड येथील एक अशा 4 जणांवर कारवाई करत एन.डी.पी.एस. कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २७, २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.