रत्नागिरीत देऊडमध्ये आढळला मानवी सांगाडा

रत्नागिरी:-  रत्नागिरी तालुक्यातील देऊड‚ चाटवडवाडी येथील जंगलात मानवी सांगडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारनंतर हि घटना उघड झाली आहे. जंगलमय भाग असल्याने तेथे पोहचणे कठीण झाले होते. अखेर ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळावरुन मृतदेहाची हाडे ताब्यात घेतली आहेत. शर्टने गळफास लावलेल्या स्थितीत काही हाडे आढळली आहेत. त्यामुळे अज्ञाताने गळफास लावला कि त्याची हत्या करण्यात आली याचा शोध पोलीसांनी सुरु केला आहे. मात्र त्या भागात कोण बेपत्ता असेल तर ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक विनितकुमार चौधरी यांनी केले आहे.

रविवारी या जंगलमय परिसारात रविद्र गोणबरे हे झऱ्याच्या ठिकाणाची जमीन पाहायला गेले होते. त्यांना एका झाडाला कपडयाने गळफास घेतलेल्या अवस्थेत काही मानवी हाडे दिसून आली.त्यांनी तात्काळ यांची माहिती ग्रामीण पोलिसांना  दिली. पोलिसांना माहिती मिळताच  पोलीस निरिक्षक विनितकुमार चौधरी आपल्या सहकार्यासह  तातडीने घटनास्थळी पोहचले.
 

त्यांना त्या ठिकाणी मणक्याची काही हाडे,मानवी कवटी, एक हाफ पॅन्ट, पैशांचे पाकिट त्यात ५० रुपयांची एक खराब अवस्थेतील नोट आणि एक पासपोर्ट साईज फोटा मिळाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन हा गळफास साधारणपणे ३ ते ४ महिन्यांपूर्वी घेण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मात्र मृतदेह आढळलेली जागा जंगलमय भागात असल्याने तेथे बाहेरील व्यक्ती सहज पोहचणे शक्य नाही. त्यामुळे परिसरातीलच व्यक्ती असण्याची शक्यता आहे. मात्र तब्बल तीन ते चार महिने मृतदेहाला झाल्याचा अंदाज असल्याने स्थानिक बेपत्ता व्यक्तीची माहिती नातेवाईकांनी पोलीसांना दिली नसल्याने मृतदेह नेमका कोणाचा आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.