रत्नागिरीत दुधात भेसळ करणाऱ्या दोन ठिकाणांवर छापे

अन्न सुरक्षा विभागाची कारवाई;
पिशवीतील दुध काढून करत होते विक्री

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील दोन ठिकाणी दुधामध्ये भेसळ करुन ते घरोघरी विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत समोर आला आह़े. बंद पिशवीतील दुध काढून त्यामध्ये पाणी टाकून हे दुध गवळींच्या माध्यमातून गोठय़ातील गायीचे दुध असल्याचे सांगून विक्री करण्यात येत होत़ी. दरम्यान याप्रकरणी अन्न सुरक्षा विभागाकडून दोन्ही दुधविक्रेत्यांवर दंडात्मक कारावाई केली आह़े.

अन्न सुरक्षा अधिकाऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याची तक्रार अन्न सुरक्षा विभागाकडे आली होत़ी. त्यानुसार शहर व लगतच्या परिसरात दुध विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत होत़ी. काही ग्राहकांना पिशवीबंद दुधाऐवजी घरच्या गायीचे दुध पाहिजे असल्याने घरोघरी सकाळी फिरणाऱ्या गवळींकडून दुध घेणे पसंत केले जात़े. या गवळींवर नजर ठेवली असता ते मारुती मंदिर परिसरातून बाहेर पडत असल्याचे आढळून आल़े.

अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याठिकाणी पाहणी केली असता हे गवळी पिशवीबंद दुधाच्या पिशव्या फोडून ते दुध एक कॅनमध्ये भरत असल्याचे दिसून आल़े. तसेच या दुधामध्ये पाणी मिक्स करण्यात येवून नंतर या दुधाची घरोघरी विक्री करुन ग्राहकांची फसवणुक केली जात होत़ी. अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी अधिक तपास केला असता अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु असल्याचे उघड झाल़े. त्यानुसार मारुती मंदिर परिसरातील या दोन्ही ठिकाणावर अन्न सुरक्षा विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आह़े.

मागील अनेक दिवसांपासून या भेसळयुक्त दुध पुरविणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत होत़ा. अखेर एका ग्राहकाकडून आलेल्या तक्रारीनंतर अन्न सुरक्षा विभागाकडून पाळत ठेवण्यात आली होत़ी. यामध्ये घरोघरी दुधविक्री करणारे गवळी दुध कोठून आणतात, त्यांचा दिनक्रमावर लक्ष ठेवण्यात आल़े. यानंतर हा सर्व भेसळीचा प्रकार समोर आल़ा सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा दिनानाथ शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचुपुते यांनी केल़ी.

एकदा तरी दुध पुरविण्यात येणाऱ्या ठिकाणी भेट द्या
भेसळयुक्त दुधाबाबत ग्राहकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याने सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा विभागाचे दिनानाथ शिंदे यांनी सांगितल़े. गोठ्यातील गायीचे काढलेले दुध हे थोडेसे कोमट असत़े. त्यामुळे घरी आलेले दुध अतिथंड जाणवत असल्यास ते पिशवीतील असू शकत़े. अधिक सुरक्षेसाठी आपणाला दुधाचा पुरवठा करणाऱया गवळीच्या गोठय़ाला भेट द्या, त्याच्याकडे असणाऱया गायी अथवा म्हशी दुध देणाऱया आहेत का याची चौकशी केल्यास फसवणुक टाळणे शक्य होईल़ –दिनानाथ शिंदे (सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा, रत्नागिरी)