रत्नागिरीत दिसल्या उडत्या तबकड्या की आणखी काही… उत्सुकता शिगेला

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील आकाशात काही दिवसांपूर्वी एका रेषेत जाणाऱ्या आणि प्रकाशमान होणाऱ्या वस्तू दिसल्या आहेत. यामुळे खगोलप्रेमींसह अनेकांची उत्सुकता ताणली असून या उडत्या तबकड्या तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

रत्नागिरी शहराच्या आकाशात 18 डिसेंबर ते 22 डिसेंबरच्या कालावधीत एका सरळ रेषेत वरच्या दिशेने जाणाऱ्या आणि प्रकाशमान होणाऱ्या वस्तु दिसल्याचा दावा केला जात आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटो देखील सध्या कुतुहलापोटी मोबाईलच्या माध्यमातून फिरताना दिसत आहेत. यामुळे खगोल प्रेमींसह अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे. रत्नागिरी शहर आणि संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणांहून असा अनुभव काहींनी घेतला आहे. हि गोष्ट परग्रहावरील तबकडी किंवा युएफओ तर नाही ना? असा देखील सवाल केला जात आहे.मात्र, आकाशात दिसलेली वस्तु हि परग्रहावरील तबकडी किंवा युएफओ नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सध्या इंटरनेट सेवेबाबत एलन मस्क यांची स्पेस एक्स हि कंपनी विविध प्रयोग करत आहे. त्यासाठी मोठ्या संख्येनं एकाला एक जोडून असे उपग्रह आकाशात सोडले गेले आहेत. हेच उपग्रह यावेळी दिसल्याचं जाणकार सांगतात. रत्नागिरीमधून अशा प्रकारे उपग्रह दिसण्यापूर्वी ये काश्मिरमध्ये आणि त्यानंतर मंगलोरमध्ये देखील दिसल्याचं जाणकार सांगतात. पण, असं असलं तरी याबाबत आणखी अभ्यास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.