रत्नागिरीत चायनीज सेंटरमध्ये दारुविक्री; 2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त 

रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन फाट्यानजीक चायनीज सेंटरवर टाकलेल्या धाडीत देशी-विदेशी मद्याच्या 2 लाख 88 हजार 907 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली आहे. 

रेल्वे स्टेशन फाट्याजवळ एका हौसिंग सोसायटीमध्ये असलेल्या चायनीज सेंटरमध्ये देशी- विदेशी मद्याचा साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरुन गुरुवारी सकाळी भरारी पथकाने सापळा रचला होता. यावेळी मिळालेल्या माहितीची खात्री करुन या पथकाने येथील चायनीज सेंटरवर धाड टाकली.
या कारवाईत चायनीज सेंटरमधून 2 लाख 88 हजार 907 रुपयांचा देशी विदेशी मद्याचा साठा भरारी पथकाने जप्त केला. तसेच लॉकडाऊनचा फायदा घेऊन वाहनातून देशी विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती देखील भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार एका कारची झडती घेतलाी असता त्यामध्ये हा साठा मिळून आला.

ही कारवाई विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक  सुनील सावंत, किरण पाटील, विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांनी केली. या कारवाईत अविनाश सिताराम दळवी (वय 44) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.