रत्नागिरी:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथून रत्नागिरी तालुक्यात गावठी बॉम्ब विक्रीसाठी आलेल्या टोळीतील दोघांना जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९ जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. ते दोघे बॉम्बचे सॅम्पल दाखवण्यासाठी आले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बॉम्ब विक्रीचा व्यवहार होणार होता. परंतु त्यापूर्वीच पोलिसांच्या पथकाने त्यांचा डाव उधळून लावला.
वेंगुर्ले येथील रामा सुरेश पालयेकर (वय २२), श्रीकृष्ण केशव हळदणकर (वय २६रा. गावडेश्वर मंदिर) हे दोघे शनिवारी सायंकाळी ७:३० बातम्या सुमारास वेंगुर्ले येथे येथून लांजामार्गे हातखंबा येथे दुचाकीवरून आले. वेंगुर्ले येथून दोन तरुण गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरी येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथक आला मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी सहा वाजल्यापासून पोलिसांनी हातखंबा येथे सापळा लावला होता.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालीहून रत्नागिरीच्या दिशेने एक दुचाकी भरधाव वेगाने येत होती.(एमएच ०७-एपी-२७००) हि दुचाकी दिसतात पोलिसांनी तिला थांबवले, परंतु बॉम्ब असल्याने तरुण पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यात नऊ जिवंत गावठी बॉम्ब आढळले.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून जिवंत बॉम्ब त्यांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती ग्रामीण पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचानामा केला. पोलीस हे.कॉ. उदय चांदणे यांनी दिलेल्या तक्रारीवरू ग्रामीण पोलिसांनी रामा पालयेकर,श्रीकृष्ण हळदणकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
वेंगुर्ला येथून जिवंत गावठी बॉम्ब घेऊन आलेले तरुण रत्नागिरी तालुक्यात बॉम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी सॅम्पल म्हणून हे बॉम्ब ते दाखविण्यासाठी घेऊन आले होते .त्या बॉम्बचा वापर डुकरांच्या शिकारीसाठी केला जातो. तर यापूर्वी अनेक वेळा या बॉम्बचा स्फोट होऊन वन्य प्राण्यांचा व पाळीव प्राणी, माणसांनाही आपला प्राण गमवावा लागला होता.रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब जिल्ह्याबाहेरुन पुरविले जात असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात शिकारीचे प्रमाण मोठे आहे हेही यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस या टोळीच्या मुळापर्यंत जाणार का? रत्नागिरी तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार रोखणार का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत.