रत्नागिरी:- रत्नागिरी‚ कोल्हापूर मार्गावरील कारवांचीवाडी महालक्ष्मी मंदिरानजीक असलेल्या दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी लुटले. त्यांच्याकडे असलेली सुमारे १४ हजार रुपयांची रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जिल्ह्यात ठिकाणी नाकाबंदी सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत संबंधित गाडी पोलिसांना आढळलेली नाही. तर रात्री उशिरा अज्ञातांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम ग्रामीण पोलीस स्थानकात सुरू होते.
रत्नागिरी‚कोल्हापूर या मुख्य मार्गावर कारवांचीवाडी ते खेडशी महालक्ष्मी मंदिर या भागात असलेल्या एका दुकानासमोर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक चार चाकी गाडी येऊन थांबली. गाडीतून तिघे खाली उतरले. त्यांनी दुकान मालकाला धमकावले. त्यानंतर एकाने शस्त्राचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. त्यावेळी दुकानाच्या गल्ल्यात असलेली सुमारे १४ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. चार चाकी गाडीची तिघे खाली उतरले होते. तर एकजण गाडीतच होता. पैसे घेतल्यानंतर ते भरधाव वेगाने हातखंबाच्या दिशेने निघून गेले.
या घटनेची माहिती दुकान मालकाने ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांच्यासह ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पैसे काढून घेतल्यानंतर संबंधित गाडी हातखंब्याच्या दिशेने निघून गेली होती. त्यामुळे पोलिसांनी महामार्गासह अंतर्गत मार्गावर नाकाबंदी करून गाडीचा शोध सुरू केला होता. तर संबंधित दुकान मालकाची तक्रार घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस स्थानकात सुरू होते.