रत्नागिरीत कचऱ्याची बित्तंबातमी देणार ॲप

टाळाटाळ करणारे कळणार ; पालिका होतेय सज्ज

रत्नागिरी:- घनकचऱ्यावर आयसीटी बेस्ड (इन्फॉर्मेशन ॲंड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) प्रणालीची विशेष नजर राहणार आहे. शहरातील सुमारे ३० हजार मालमत्तांमध्ये ओला व सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डस्टबिनवर विशिष्ट क्युआर कोड लावण्यात येणार आहेत. संकलन कर्मचाऱ्यांद्वारे कचरा घेतल्यानंतर कोड स्कॅन केले जातील.याची माहिती ऑनलाईन ॲपमध्ये मिळणार आहे. त्यामुळे नियमित कचरा कोणाचा येतो आणि कोण कचरा टाकण्यात टाळाटाळ करतो, त्यावर पालिकेचे लक्ष राहणार आहे. घंटागाड्या ठरलेल्या मार्गावर गेल्यात की नाही हे सुद्धा या ऑनलाईन कचरा ॲपने कळणार असल्याने अनेक गैरप्रकारांना चाप बसणार आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाच्या साह्याने घनकचऱ्याच्या संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया यावर पालिकेने भर दिला आहे. महाराष्ट्र शासनाने दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी आयसीटी बेस्ड प्रणाली कार्यरत केली आहे. शहरातील सर्व मिळकती व प्रत्येक घरातील ओल्या व सुक्या कचऱ्याच्या डस्टबिनवर क्युआर कोड स्टीकर लावण्याचे काम सुरू आहे.रोजचे कचरा संकलनाचे टेंडर देण्यात आलेले असून, घंटागाडी चालकांना प्रत्येक भागात संकलन करावे लागणार आहे. एखाद्या भागातून कचरा घेतला नाही तर त्याची माहिती सदर ॲपवर मिळणार आहे. या ॲपमुळे घंटागाड्यांनाही दररोज ठराविक वेळेत शहरातील प्रत्येक प्रभागातील कचरा गोळा करावा लागणार आहे. क्युआर कोड चिकटवण्याचे काम महिनाभरात पूर्ण झाल्यानंतर हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू राहणार आहे.

…यावर येणार नियंत्रण

घंटागाडीत रोज नागरिक देत असलेला कचरा स्कॅनिंग होणार असल्याने एखाद्या भागात नागरिकांनी घंटागाडीला कचरा दिला नाही तर ते समजणार आहे. अन्यत्र फेकला जात आहे का याचीही माहिती मिळणार आहे. व्यावसायिक, फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, हातगाडे यांच्या कचऱ्याकडेही लक्ष राहणार आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाकडून हा उपक्रम आला आहे. कचरा टाकण्यात चुकारपणा करणाऱ्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणे सोपे जाईल. घंटागाड्यांचा मार्गही समजणार आहे.
तुषार बाबर, मुख्याधिकारी रत्नागिरी पालिका