रत्नागिरी:-मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यातील कर्मचार्यांना कामावर हजर व्हा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मोठ्या संख्येने कर्मचारी हजर होण्याची शक्यता एसटी प्रशासनाने वर्तवली आहे. विलिनीकरण होणार नाही, कर्मचार्यांच्या पगारवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करु या, आता कामावर हजर व्हा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी आगारा बाहेर जोरदार जल्लोष केला.
तसेच उच्च न्यायालयानेही 22 एप्रिलपर्यंत कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई न करता हजर करुन घ्या, असे आदेश दिल्याने आता कर्मचार्यांकडे दुसरा पर्यायही शिल्लक राहिला नाही. त्यामुळे उर्वरित कर्मचारी हजर होतील, असा अंदाज आहे.
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी
येथील माळनाका एसटी विभागीय कार्यालयाबाहेर संपात सहभागी असलेल्या कर्मचार्यांनी गुरुवारी दुपारी अचानकपणे ढोल-ताशांचा गजर करत फटाक्यांची आतषबाजी केली. मागण्या मान्य झाल्याचा आनंद साजरा करण्यात आल्याची चर्चा याठिकाणी कर्मचार्यांमध्ये सुरू होती.