रत्नागिरीत एसटीचे 30 टक्के वेळापत्रक सुरू

रत्नागिरी:- राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे आठवडाभरात 50 टक्के वेळापत्रक सुरु होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 50 टक्के नसले तरी 30 टक्के वेळापत्रक सुरु झाले आहे. तसेच दोन दिवसात 36 कर्मचारी नव्याने हजर झाले असल्याची माहिती रत्नागिरी विभागाने दिली.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एसटीचे वेळापत्रक 50 टक्के होईल, असा विश्वास प्रशासनाला होता. कारण प्रशासनाने विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होणार होते. मात्र, अपेक्षित कर्मचारी हजर झाले नसले तरी वेळापत्रक 30 टक्क्यांवर आल्याची माहिती एसटी अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, सोमवारी आणखीन काही कर्मचारी कामावर नव्याने हजर होणार आहेत.  न्यायालयाने कर्मचार्‍यांना 12 एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आवाहन केले असल्याने मंगळवारपर्यंत संपाबाबत  अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
एस. टी. कर्मचार्‍यांच्या बाजूने केस लढणारे अ‍ॅड. सदावर्ते यांना अटक झाल्याने काही कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता संप मागे घेण्याबाबत कर्मचारी नेमका काय निर्णय घेणार, या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.