रत्नागिरीत उभे राहिले राज्यातील पहिले बाल कोव्हीड केंद्र

रत्नागिरी:-कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मुकाबला करतानाच जिल्हा प्रशासनाने तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरुन पूर्वतयारी सुरु केली आहे. रत्नागिरीत उभारलेले बाल कोव्हीड केंद्र हे राज्यातील पहिलेच ठरेल. याबद्दल पूर्णतः समाधानी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी केले.

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील जिल्हा क्रीडा संकुलात 100 खाटांच्या बाल कोव्हीड केंद्रासह महिला रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती संच व स्वस्तिक समर्पित बाल कोव्हीड रुग्णालयाचे लोकार्पण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार अनिकेत तटकरे, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, क्रीडा संकुलात 100 बेडची व्यवस्था असणारे बाल कोव्हीड केंद्र अत्यंत अभिनव स्वरुपातील आहे. या केंद्रात लहान मुलांना खेळण्याची साधने, चित्र, पौष्टिक खाऊ आणि व्हिडीओ बघण्याची व्यवस्था आहे. यासोबत महिला रुग्णालय रत्नागिरी येथे ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारणी करण्यात आली आहे. याची क्षमता प्रतिदिन 170 जम्बो सिलिंडरची आहे. रुग्णालयात 14 खाटांच्या बालरुग्ण अतिदक्षता कक्षाचीही उभारणी केली आहे. रत्नागिरी शहरातील स्वस्तिक रुग्णालयाचे रुपांतर समर्पित बाल कोव्हीड रुग्णालयात केले आहे. तेथे 5 खाटांना व्हेंटिलेटर सुविधा राहणार आहे. सोबत 40 खाटा ऑक्सिजन सुविधेसह सज्ज आहेत.

याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, तिसर्‍या लाटेपूर्वी दूरदृष्टी ठेवून जिल्हा स्वयंसिध्द असावा असे प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केले आहेत यात वेगवेगळ्या माध्यमातून विलगीकरण व्यवस्था ऑक्सिजन सुविधा आदींचा समावेश आहे.
यावेळी अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार अनिकेत तटकरे तसेच आमदार योगेश कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आभार मानले.