रत्नागिरीत उघड झालेल्या कॉलिंग सेंटरची देशाच्या संरक्षण विभागाकडून दखल; पाकिस्तान कनेक्शनबाबत कसून तपास

रत्नागिरी:- येथे कारवाई केलेल्या आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कॉलिंग सेंटरची गंभीर दखल देशाच्या संरक्षण विभागांनी घेतली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील प्रकरण असल्याने सखोल आणि बारकाईने तपास सुरू आहे. पाकिस्तान सह अन्य देशाशीही कनेक्शन आहे का, या सर्व बाजुंनी तपासाला दिशा देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस सूत्रांनी याला दुजोरा दिला.

आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कॉलिंग सेंटरचा शहरातील आठडा बाजार येथे पर्दाफाश झाला. या सेंटरमधून कोणत्या-कोणत्या देशात कॉल झाले, याची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी संबंधित कंपनीचा राऊटर ताब्यात घेऊन त्यावरून सीडीआर (कुठे फोन केली त्याची माहिती ) काढण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस आणि एटीएसची टीम काम करत आहे. या संशयित प्रकरणातील मास्टर माईंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) यांची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र यामध्ये कॉल सेंटर चालविण्यास जागा देणारे अलंकार विचारे (रा. छत्रपतीनगर, रत्नागिरी) अडचणीत आले आहेत. आपल्या जागेत कोणते सेंटर सुरू होणार आहे, याची माहिती न घेता त्यांनी परवानगी दिल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. या सेंटरची यंत्रणा कार्यान्वित करून देणारा अजून फरार आहे. सेंटरला शासनाची अधिकृत परवानगीही नसल्याचे उघड झाले आहे.

देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कॉलिंग सेंटरचा विषय आतिशय गंभीर आणि महत्त्वाचा आहे. पाकिस्तानसह अन्य देशाशीही कनेक्शन आहे का या सर्व बाजुंनी आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहे. या विषयावर बारीक लक्ष देऊन काम सुरू आहे. ठोस माहिती हाती लागेपर्यंत याबाबत हो किंवा नाही, असे बोलणे योग्य नाही. -डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी