रत्नागिरी:- रत्नागिरीत 30 खाटांच्या आयुष रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाल्यानंतर आता राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमांतर्गत आयुष सर्व्हिसेस या उपक्रमाखाली हे रुग्णालय होणार आहे.
येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अडीच एकर जागेत हे रुग्णालय होणार होते. परंतू नंतर त्याची परवानगी ग्रीन झोनमुळे रद्द करण्यात आली. त्या ऐवजी महिला रुग्णालयाजवळी कुष्ठरुग्ण वसाहतीमधील 4 एकर जागा निश्चित करण्यात आली. त्याला अनुसरुन सर्व मंजुरींची प्रक्रिया सुरु झाली आहे. आयुष अंतर्गत विविध सेवा जनतेसाठी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीकोनातून आयुष मंत्रालयाने जिल्हास्तरावर आयुष रुग्णालय बांधण्याबाबत निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमांतर्गत आयुष सर्व्हिसेस या उपक्रमाखाली प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी 30 खाटांचे हे आयुष रुग्णालय बांधण्याबाबत तरतूद केलेली आहे.
जिल्ह्यामध्ये आयुष रुग्णालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथील शेती कंपाउंड या ठिकाणची जागा आयुष रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. परंतु, ही जागा ग्रीन झोनमध्ये येत असल्याने हा प्रस्ताव रद्द झाला होता. आयुष मंत्रालय हे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी मंत्रालय आहे. जे भारत सरकारचा भाग आहे. हे मंत्रालय पर्यायी औषधाच्या क्षेत्रात विकास, शिक्षण आणि संशोधनाची योजना आखण्याचे कार्य करते. रुग्णालयामार्फत रुग्णांवर पूर्ण आयुर्वेदिक उपचार केला जातो.