रत्नागिरीतील 1231 कोटींच्या कामांचा रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्ह्यातील 798 कामांचा समावेश

रत्नागिरी:- रस्ते, पुलांसह रेल्वेस्थानकांना जोडणार्‍या व रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याच्या सुमारे 1231 कोटी 50 लाखांच्या कामांचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. विमानतळांप्रमाणेच यापुढे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील अन्य रेल्वेस्थानकांच्या जोडरस्त्यांना निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचेही त्यांनी विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील रस्ते, पुल, इमारती व रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाच्या कामांचा ऑनलाईन शुभारंभ बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रत्नागिरीतील विश्रामगृहावरुन करण्यात आला. यावेळी सिंधुरत्नचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत, भाजपाचे लोकसभाप्रभारी मा. आ. प्रमोद जठार, सहप्रभारी मा. आ. बाळ माने, मा. आ. डॉ. विनय नातू, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश मयेकर, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. रविंद्र चव्हणा म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास होत आहे. त्यादृष्टीने रेल्वेस्थानकांचा कायापालट व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. विमानतळाप्रमाणे अद्ययावत अशी रेल्वेस्थानकांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रस्ते व पुलांची 785 कामे असून त्यासाठी 1057 कोटी 10 लाख रुपयांचा तर 13 इमारतींसाठी 174 कोटी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे ना. चव्हाण यांनी सांगितले. मागील काही वर्षांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी देण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सिंधुरत्नचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिल्याबद्दल ना. चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. रस्त्यांची जवळपास सर्वच कामांना निधी दिला आहे. त्याचप्रमाणे पत्तन विभागाच्या 5 ते 7 कामांसाठी 50 ते 60 कोटींच्या निधीची आवश्यकता असून ना. चव्हाण तो निधी उपलब्ध करुन देतील असा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार बाळ माने म्हणाले की, युती शासनाच्यावेळी कोकणासाठी मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते मोठ्याप्रमाणात झाले होते. त्यानंतर ना. चव्हाण यांनी इतक्या मोठ्याप्रमाणात निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमात माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात सुत्रसंचालन उमेश कुलकर्णी यांनी केले. बांधकामच्या अधीक्षक अभियंता वैशाली नाईक यांनी बांधकाम मंत्र्यांचे स्वागत केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गतील रस्ते, पूल व इमारतींच्या कामाचा ऑनलाईन शुभारंभानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कुवारबाव येथे रेल्वेस्थानकाच्या कामाचा शुभारंभ केला.