रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी बौध्दवाडीत गतवर्षीपासून जमिनीला भेगा गेल्या असून डोंगरातील काही भाग खचला आहे. मागील पावसात त्यात भर पडल्याने येथील ६० घरांना धोका निर्माण झाला आहे. या भागाची भुगर्भ तज्ज्ञांनी पाहणी केली असून नाल्याजवळ भिंत बांधण्याचा प्रस्ताव तहसिलदार कार्यालयाडून जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
यंदा अतिवृष्टीमध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक गावात दरडी कोसळून घरांना धोका निर्माण झाला आहे. पोसरे येथे सात घरांवर दरड कोसळली. याच कालावधीत ठिकठिकाणी असे प्रकार घडले होते. रत्नागिरी तालुक्यात गोळप येथे एका घराजवळ दरड कोसळली. त्याचप्रमाणे हरचिरी बौध्दवाडीतील जुने दुखणे पुन्हा वर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षी अतिवृष्टीमध्ये घरांजवळील भाग खचला असून जमिनीला भेगा गेलेल्या होत्या. मागील महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने त्यात भर पडली आहे. याठिकाणी सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गतवर्षी भुगर्भ तज्ज्ञांनी पाहणी करुन उपाय सुचवलेले होते. बौध्दवाडीच्या जवळ नाला आहे. त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारुन खचण्याच्या प्रकारांना आळा बसू शकतो. याबाबतचा प्रस्ताव तहसिलदार कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार करुन निधी तरतूदीसाठी पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सध्याच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी तहसिलदार घटनास्थळी भेट देणार आहेत.
—