रत्नागिरी:- पर्यटकांचा राबता असलेल्या रत्नागिरीतील आरेवारेसह भाट्ये, नेवरे समुद्रकिनारे तेलाचा तवंग साचल्यामुळे काळवंडले आहेत. हे किनारे विद्रुप झाले असून पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्याबरोबरच किनार्यावर जाणार्या पर्यटकांसह नागरिकांनाही त्रास होत आहे. हे किनारे लवकरात लवकर स्वच्छ करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेले दोन दिवस रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे आणि भाट्ये किनारी तेलाच्या तवंग साचला आहे. आरे-वारे समुद्र किनार्यावर एक ते दीड किलोमीटर परिसरात काळे गोळे साचलेले आहेत. असा पहिलाच प्रकार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. भाट्ये किनारी मोठ्याप्रमाणात तवंग साचलेला नाही. काही भागात ऑईलचे गोळे वाळूत आहेत. हा तवंग तसाच साचून राहीला तर किनार्यावर येणार्या पशु, पक्षांना त्याचा त्रास होऊ शकतो. एखादा पक्षी या तवंगावर बसला तर त्याचे गोळ पंखाला चिकटण्याची शक्यता असते असे सागरी अभ्यासकांकडून सांगण्यात आले. सुट्ट्यांचा मोसम सुरु होत असल्याने या कालावधीत दोन्ही किनार्यांवर पर्यटकांचा राबता सुरु झाला आहे. काळ्या तेलामुळे किनारे अस्वच्छ झाले आहेत. किनार्यावर फिरायला आलेलांना त्रास होत आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे. जहाजामधून गळती झालेले ऑईल वाहत किनार्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेकवेळा पावसाळ्याच्या सुरुवातीला मालवाहू जहाजाच्या देखभाल दुरुस्तीची कामे करताना खराब झालेल ऑईल समुद्रात टाकले जाते. ते तवंग गोळ्याच्या रुपाने किनार्यावर येण्याची शक्यता असते. यामुळे सागरी प्रदुषणाला सामोरे जावे लागणार असून प्रशासनाकडून वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.