रत्नागिरी:- जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नातून रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न पूर्णतः मार्गी निघाला असून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या शंभर जागेसाठी राष्ट्रीय विज्ञान आयोगाने मान्यता दिली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ना. उदय सामंत यांचे गेल्या अनेक वर्षांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत.
कोकणातील प्रमुख शहर म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी शहर, जिल्ह्यात आरोग्याची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हती. यासाठी रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे होते. तशी घोषणा विद्यमान पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केली होती. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. उद्यमनगर येथील महिला रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता मिळाली नव्हती. मात्र दि. 26 एप्रिलला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनी 100 जागांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्य दिली असून या वर्षात 100 विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आता पर जिल्ह्यातील डॉक्टरवर न अवलंबून राहता रत्नागिरीतच आवश्यक डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.