रत्नागिरी:- सीएनजी गॅसचा कोटा कंपनीकडून कमी येत असल्यामुळे जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संतापलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी गुरूवारी (ता. ९) जे. के. फाईल्स येथील महानगर गॅसच्या कार्यालयावर धडक दिली. त्या वेळी गॅसच्या तुटवड्याचे कारण स्पष्ट झाले. याबाबत आमदार राजन साळवी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे शिवसेना प्रणित रिक्षासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मे महिन्यातील उन्हाळी सुट्टी हा रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रवासीभाडे मिळण्याचा हंगाम आहे; परंतु ज्या रिक्षा सीएनजीवर चालतात त्या रिक्षाचालकांना व्यवसाय करताना अडचणी येत आहेत. सीएनजी पंपांवर गॅस उपलब्ध नसतो. गॅस उपलब्ध झाल्यानंतर तो रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत राहावे लागते. त्यामुळे वेळेत रिक्षा व्यवसाय करताच येत नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडील नोंदीनुसार २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात सर्व प्रकारची ४ लाख ४१ हजार ७२ वाहने आहेत. त्यामध्ये ३ लाख १२ हजार ९७० दुचाकी वाहनांचा समावेश आहे. प्रत्येक घरात १ ते २ दुचाकी असल्याने रिक्षा व्यवसाय थंडावला आहे. तरीही चाकरमानी किंवा पर्यटक रत्नागिरीत येतात तेव्हा रिक्षा व्यवसायाला गती मिळते. सध्या मे महिना असतानाही सीएनजी मिळत नसल्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यात सीएनजी चालणारी एकूण ८ हजार ७१७ वाहने असून, त्यात रत्नागिरीतील २ ते ३ हजार रिक्षांचा समावेश आहे. रत्नागिरीत १५ ते २० दिवसांपासून सीएनजीची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे हैराण झालेले रिक्षा व्यावसायिक एकवटले आहेत. शिवसेनाप्रणित रिक्षासेनेच्या पदाधिकाऱी काल महानगर गॅसच्या जे. के. फाईल्स कार्यालयावर धडकले. कंपनीचे समन्वयक अमोल शिंदे यांच्यासोबत त्यांनी सीएनजी तुटवड्याबाबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले, ठरलेल्या कोट्यापेक्षा कमी प्रमाणात गॅसचा पुरवठा होत आहे. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. याबाबत गेल कंपनीशी आम्ही पत्रव्यवहार सुरू ठेवला आहे. त्या पत्राची झेरॉक्सदेखील त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दाखवली. निर्माण झालेल्या या परिस्थितीबाबत लवकरच शिवसेनेचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी चर्चा करणार आहेत.