रत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी दुसरी हाऊसबोट दाखल

रत्नागिरी:- पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महिला बचतगटांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्याच्या उद्देशाने उमेदअंतर्गत राई-भातगावपाठोपाठ जयगड खाडीत दुसरा हाऊसबोट प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. दुसरी बोट नुकतीच दाखल झाली असून, ती वाटद प्रभागसंघाला दिली जाणार आहे. केरळसह काश्मिरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना खाडीमध्ये फिरण्याचा आनंद घेता येणार आहे.

बचतगटांना बळ देण्यासाठी सिंधुरत्न योजनेमधून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण विकासयंत्रणेच्या माध्यमातून या पाच हाऊसबोटी खरेदी करण्यात आल्या होत्या. हाऊसबोटीचे नियोजन कसे करायचे, याची माहिती घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बचतगटातील महिला केरळ दौऱ्यावर गेल्या होत्या. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची ही संकल्पना होती. पहिली हाऊसबोट राई-भातगाव येथील खाडीत दाखल झालेली आहे. त्याचे व्यवस्थापन कोतवडे प्रभागाकडे दिले गेले आहे. जयगड येथील खाडीत फिरवण्यासाठीची दुसरी हाऊसबोट नुकतीच दाखल झाली आहे. त्या बोटीचे काम पूर्ण करण्यासह प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी जाईल. या हाऊसबोटीत आठजण प्रवास करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ही बोट सैतवडे, जांभारी, कासारी, आगरनरळ अशी खाडीमार्गे फिरणार आहे. चोविस तास बोटीमध्ये पर्यटक राहतील, असे नियोजन केले जाणार आहे. जयगड खाडीकिनारी असलेल्या कांदळवनामधील पशुपक्षी पाहणे, मासे पकडणे, सनसेट पाहणे याचा आनंद घेता येणार आहे.