रत्नागिरीतील नेत्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे नजरा 

रत्नागिरी:- रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांचा प्रभाग क्रमांक  5 अ मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला असला तरी नगराध्यक्षपदाची उमेदवारी किंवा प्रभाग क्रमांक  6 ब सर्वसाधारण जागा पर्याय आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेना गटातील विजय खेडेकर यांना मात्र सर्व बाजूंनी संधी उपलब्ध आहे. आता नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची वाट पाहिली जात आहे.  माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांचा पूर्वीचा प्रभाग क्र. 1 ची ब सर्वसाधारण जागेची संधी कायम आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीतील आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली. यामध्ये अनेक माजी नगरसेवकांसमोर जागा आरक्षित झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र काहींना संधीही मिळाली आहे. ज्यांच्या सौभाग्यवतींचे प्रभाग आरक्षित झाले आहेत, तेथे त्यांच्या पतीदेवांना उमेदवारी मिळू शकणार आहे.
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांचा प्रभाग क्रमांक 5 हा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. परंतु या प्रभागातील अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर उमेदवारीचा प्रश्न असल्याचे मानले जात आहे. मात्र त्यांनी नगराध्यक्ष असताना लगतच्या प्रभागासह संपूर्ण शहरात विकासकामे केली आहेत. त्यामुळे ते शेजारच्या प्रभाग क्र. 6 ब मधून उमेदवारी मिळवू शकतात. त्याचवेळी ते नगराध्यक्ष पदाचेही उमेदवार आहेत. मात्र ते कोणत्या सेनेतून लढणार हे गुपित आहे.
मुख्यमंत्री शिंदेप्रणित शिवसेनेत असलेले विजय खेडेकर हे सुद्धा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती माजी नगनरसेविका वैभवी खेडेकर यांनाही संधी आहे. प्रभाग क्र. 9 अ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.  त्याचबरोबर दुसरी ब जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने येथे माजी नगरसेविका वैभवी खेडेकर यांनाही संधी आहे. त्याचवेळी नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाले तरी वैभवी खेडेकर यांचा क्लेम राहणार आहे. तर अनुसूचित जाती प्रभागासाठी विजय खेडेकर यांना संधी आहे. अशा दोन्ही जागांसह नगराध्यक्षपदाची उमेदवारी या दाम्पत्यासाठी खुली आहे. त्यात या दोघांचे काम आणि जनसंपर्कही तगडा
आहे.

रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांचा प्रभागही त्यांच्यासाठी शाबूत राहिला आहे. प्रभाग क्रमांक 1 ब जागा सर्वसाधारण आरक्षित झाली असल्याने या मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते. अ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे. माजी नगरसेविका दिशा साळवी यांच्या प्रभाग क्रमांक 8 मधील अ जागा मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली असली तरी ब जागा सर्वसाधारण झाली आहे. येथून त्यांचे पती दत्तात्रय  उर्फ बाळू साळवी या प्रभागातील ना. शिंदेप्रणित  शिवसेनेचे प्रमुख   दावेदार उमेदवार म्हणून मानले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या माजी सभापती श्रद्धा हळदणकर यांचीही प्रभाग क्र. 7 मधील अ जागा मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे त्यांचीही उमेदवारी निश्चित आहे. मात्र त्यांच्या प्रभागातील माजी नगरसेवक मधुकर घोसाळे मूळ शिवसेनेतच  असल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला श्रद्धा हळदणकर यांच्यासोबत दुसरा उमेदवार शोधावा लागणार आहे. हा दुसरा  उमेदवार सुद्धा निश्चित झाला असून त्यांचे नाव उघड केेले जात नसले तरी भारती आडनावाचे कोणीतरी उमेदवार आहे , असे सांगितले जात आहे. ही 7 ब जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी   आरक्षित आहे.