रत्नागिरीतील निम्मी उबाठा होणार खालसा; २४ जानेवारीला बडे पदाधिकारी शिंदे गटात

रत्नागिरी:- रत्नागिरीत शिवसेना शिंदे गट शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. २४ जानेवारीला शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटातील अनेक मातब्बर नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

तालुक्यातील उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत दि. 24 जाने. रोजी ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा उबाठा शिवसेनेला मोठा धक्का समजला जात आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विधानसभा निवडणुकीत नाराज असलेला जि. प.चा एक बडा नेताही शिंदे गटाच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडूणकीतील दारूण पराभवानंतर राज्यात अनेक ठिकाणी उबाठा शिवसेनेला धक्केवर धक्के मिळत असताना रत्नागिरी तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने रत्नागिरी तालुक्यात उबाठा शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशकरत्यांची यादी फार मोठी आहे. यात दिग्गज पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात उबाठा शिवसेनेचे रत्नागिरी तालुका प्रमुख बंडया उर्फ प्रदिप साळवी, उपतालुकाप्रमुख राकेश साळवी, विभागप्रमुख महेंद्र झापेडकर, माजी सभापती सौ. देवयानी झापेडकर, विभागप्रमुख वैभव पाटील, विभागप्रमुख अभय खेडेकर, कार्यालयीन प्रमुख संदिप सुर्वे तसेच हरचिरी जि. प. गटातील पाच सरपंच, फणसोप गावचे सरपंच राधिका साळवी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते दि. 24 जाने. रोजी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थित शिेंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे उबाठा शिवसेनेला हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल. दरम्यान विधानसभा निवडणूकीत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले उबाठा पक्षाचा पदाधिकारी व जि. प. चा प. अध्यक्ष असलेला एक बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या रत्नागिरीतील राजकीय वतुर्ळात सुरू आहे.