रत्नागिरीतील नालेसफाई वेगात; २५ कर्मचार्‍यांच्या दोन टिम कार्यरत

रत्नागिरी:- नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने यावर्षीही शहरातील वहाळ आणि गटारांची वेळेत साफसफाई सुरू केली आहे. आगामी पंधरा दिवसात सर्व वहाळ आणि गटारांची स्वच्छता होणार आहे. वहाळांची स्वच्छता जेसीबीद्वारे केली जात असून, गटारांच्या स्वच्छतेसाठी २५ सफाई कामगार कार्यरत आहेत. यामुळे पावसाळ्यात वहाळ तुंबणे आणि गटारातील पाणी रस्त्यावर येण्याच्या घटना थांबणार आहेत.

रत्नागिरी शहरात तोरण नाल्यासह सहा प्रमुख वहाळ आहेत. त्याचबरोबर सर्वत्र गटारेसुद्धा आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या वहाळ आणि गटारांची स्वच्छता करावी लागते. त्यानुसार आरोग्य विभागाचे अधिकारी अविनाश भोईर आणि स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे यांनी गेल्यावर्षीप्रमाणेच स्वच्छतेचे नियोजन केले आहे. आतापर्यंत ५० टक्केपेक्षा अधिक साफसफाई झाली असून, पुढील पंधरा दिवसात सर्व वहाळ आणि गटारांची स्वच्छता होईल असे, स्वच्छता निरीक्षक कांबळे यांनी सांगितले.

शहराच्या बाजारपेठेतील काही गटारे जुनी आणि अरुंद आहेत. या गटारांची पावसाळ्यापूर्वी वेळेत स्वच्छता झाली नाही तर मुसळधार पावसावेळी गटाराचे पाणी रस्त्यावर येते. गटारांचे पाणी रस्त्यावर येवू नये यासाठी गेल्यावर्षीपासून वेळेत साफसफाई केली जात आहे.