रत्नागिरीतील तरुणाचा यशस्वी प्रयोग; भुसा, उसाच्या चिपाडासह भाताच्या कोंड्यापासून इंधन निर्मिती

रत्नागिरी:-लाकुड गिरणीत तयार होणारा भुसा, उसाची चिपाड आणि भाताचा कोंडा या टाकावू वस्तूंचा वापर करुन जळणासाठीचे ब्रिकेटस् (कांडी कोळसा) बनवण्याचा अनोखा फंडा सडामिर्‍यातील (ता. रत्नागिरी) तरुण गौरेश सुनिल पाटील यांनी यशस्वी केला आहे. इंजिनिअरिंग झालेल्या गौरेशने ऐन कोरोना कालावधीत हा उद्योगाचा स्टार्टअप करत दगडी कोळशाला पर्यायी पर्यावरणपुरक असे जळावू इंधन रत्नागिरीतील प्रक्रिया उद्योगांना उपलब्ध करुन दिले आहे.

फळ किंवा मत्स्य प्रक्रिया उद्योगांसह विविध कारखान्यात बॉयलरसाठी दगडी कोळसा वापरतात. यामधून प्रदुषण होत असल्याने कंपन्यांमार्फत पर्यावरणपुरक पर्यायी साधनांचा वापर होत आहे. हे लक्षात घेत गौरेश पाटीलने चिपळूणमध्ये शिक्षण घेताना बॉयलरसाठी लागणार्‍या इंधनाविषयक माहिती घेतली. काही कंपन्या खर्च कमी करण्यासाठी कोल्हापूरमधून उसाच्या चिपाडापासून बनवलेले ब्रिकेटस् वापरतात. याच धर्तीवर गौरेशने लाकडाचा भुसा, उसाची चिपाड आणि भाताचा कोंडा यापासून बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक मशिन्स गुजरातमधून तर ड्रायर पंजाबमधून मागवला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही सर्व मशिन्स अडकली. कृषी आधारीत प्रकल्प असल्यामुळे कोरोना पहिल्या लाटेतील प्रादुर्भाव ओसरल्यानंतर मशिन्स दाखल झाली. सडामिर्‍या येथे कातळावरील मोकळ्या जागेत नोव्हेंबर २०२० मध्ये हा उद्योग सुरु केला. एका महिन्याला २५० ते ३०० टन ब्रिकेटस् ते बनवतात. त्यासाठी लागणारा भुसा रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूर तालुक्यातील लाकडाच्या गिरणीमधून आणला जातो तर उसाची चिपाड मिरजोळे एमआयडीसीत उसावर प्रक्रिया करणार्‍या एका कंपनीकडून मिळतात. सुमारे ३०० टन चिपाड त्यांने तीन विकत घेतली आहेत. भुसा ३ रुपये ६० पैसे प्रतिकिलो दराने तो विकत घेतो. ९० मिलीमीटर व्यास आणि ८ इंच लांब असे तुकडे बनविले जातात. या उद्योगासाठी पन्नास लाखाची गुंतवणुक आहे. रत्नागिरीतील तिन ते चार कंपन्याना आवश्यक ब्रिकेटस् पुरवले जातात. महिन्याला सर्वसाधारणपणे तीस हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो.

असा बनतो कांडी कोळसा

उसाच्या चिपाडाचे बारीक तुकडे केले जातात. तो भुगा, लाकडाचा भुसा आणि कोंडा एकत्र करुन ड्रायरमध्ये टाकला जातो. त्यातील ओलावा निघून गेल्यानंतर ब्रिकेटस् बनविण्याच्या मशिनमध्ये टाकतात. त्यामध्ये सर्व साहित्य एकत्र होते आणि त्याचा गोलाकार ब्रिकेटस् बनतात. मशिनमधून बाहेर येताना हा ओला असतो. तो बाहेर पडताना सुखतो आणि त्याचे तुकडे पाडले जातात.