रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीचे फलक खिळे ठोकून झाडावर लावले आहेत. यामुळे झाडांचा श्वास गुदमरू लागला आहे. ही जाहिरातबाजी झाडांच्या मुळावर उठू लागली आहे. शहरातील सर्वच रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडावर मुळापासून जाहिरातींचे फलक लावले आहेत.
शहरात सुरवात करताना रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडावर लावण्यात येणार्या विविध प्रकारच्या जाहिराती दिसतात. यात शाळेचे क्लासेस, संगणक क्लासेस, कॉस्मेटिक्स, हॉटेलच्या जाहिराती, लॉजिंग – बोर्डिंग, दुकानाची जाहिरात यांचा समावेश आहे. अशा अनेक विविध जाहिराती झाडावर लटकलेल्या आहेत. तर रस्त्यांवरही जाहिरातीचे फलक मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप आलेले आहे.
कुणाचीही परवानगी न घेता, कसलीही तमा न बाळगता जाहिरात फलक झाडावर लावून मिरवत आहेत. याचा परिणाम झाडांवर होत आहे. तसेच ज्यांच्या जाहिराती आहेत त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जाहिरातींचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. शहरापासून ते हातखंबापर्यंत हे चित्र दिसत आहे. त्यामुळे झाडांचे व पर्यायाने शहरांचेही विद्रुपीकरण होत आहे.