नऊ खेळपट्ट्या; तज्ज्ञ क्युरेटर्सची मदत घेणार
रत्नागिरी:- येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर रणजी किंवा प्रथम श्रेणी दर्जाचे सामने खेळले जावेत यादृष्टीने फक्त क्रिकेटसाठी पुरक असे मैदान बनविण्यात येणार आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाला बुधवारी सुरवात झाली. ७० मिटरच्या मैदानाला फेंन्सिंग केले जाणार असून नऊ खेळपट्ट्या बनविण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या तज्ज्ञ क्युरेटर्सची मदत घेतली जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर क्रिकेटचे मैदान आहे. या ठिकाणी अनेक दर्जेदार खेळाडूंचे करिअर घडले आहे. नगरपालिकेकडे असलेल्या या मैदानाची देखभाल दुरुस्तीही तेवढ्याच गांभिर्याने केली जाते; परंतु पुरेसा निधी नसल्याने ते फक्त क्रिकेट सामन्यांसाठी विकसित करता आले नव्हते. या मैदानावर अन्य खेळ, विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे खेळपट्टीची दुरवस्था झाली. पूर्वी याच मैदानावर चार रणजी सामने झाले होते. आता नव्याने क्रिकेटसाठी मैदान बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री सामंत यांनी शासनाच्या योजनेतून क्रिकेट मैदानासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. रणजी किंवा प्रथम श्रेणीचे सामने भरविण्यासाठी आवश्यक मैदान यामधून बनवले जाणार आहे. मैदानामध्ये इरिगेशन यंत्रणा, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जमिनीतून ड्रेनेज सिस्टीम, मुख्य खेळपट्टीसह नऊ खेळपट्ट्या बनविल्या जातील. मुख्य खेळपट्टी बनविताना साधारणपणे दोन फुटाची खोदाई केली जाणार आहे. काळा दगडाचा एक थर, विटांचा थर, मातीचा थर आणि त्यावर गवताचा थर टाकून क्रिकेटला पोषक अशी खेळपट्टी बनविली जाईल. यासाठी २२ इंचापर्यंत खोदाई केली जाणार असुन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या तज्ज्ञ क्युरेटस्ची मदत घेण्यात येणार आहे. मैदानाचे आऊटफिल्ड बनविताना जुने गवत काढून खोदाई केली जाईल. तिन थर टाकून त्यावर फुटभर उंचीचे सिलेक्शन वन प्रकारची गवत यावर टाकण्यात येणार आहे. हे मैदान ७० यार्डाचे असुन बाहेरील बाजुने फेन्सिंग केले जाणार आहे. मैदानाची जुनी माती खणून काढावी लागणार आहे.