रत्नागिरी:- तालुक्यातील चवे येथील वाघोळीवाडी, सोनारवाडीत भर दिवसा दुपारच्या सुमारास गवारेड्याचे दर्शन झाले. वाडीतून नेहमी रहदारी असलेल्या रस्त्यावरुन हा गवा खालगावच्या दिशेने रवाना झाला. या परिसरातील शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी (ता. 28) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गवारेडा चवे गावातील वाघोळीवाडीमधून एक गवा सोनारवाडीतील रस्त्याने पुढे चालत जाताना दिसला. सुरवातील उनाड रेडा आहे की काय असा समज ग्रामस्थांचा झाला होता. पण जवळून पाहिल्यावर तो गवा रेडा असल्याचे लक्षात आले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतामधून तो खालगाव परिसरातील जंगल भागाकडे गेला. सुदैवाने यावेळी रस्त्यावर वाहने किंवा माणसाची ये-जा नव्हती. अन्यथा भेदरलेला गवा त्रासदायक ठरला असता. तो गवा लंगडत लंगडत चालत होता. कदाचित मोठे दुखापत झाली असावी असे ग्रामस्थ सचिन काळे यांनी सांगितले. सहा महिन्यांपुर्वी सोनारवाडीतील एका ग्रामस्थाला गव्याचे दर्शन झाले होते; परंतु त्यावर कुणीच विश्वास ठेवलेला नव्हता. नदीकिनारी भाग जंगलमय असल्याने या परिसरात संगमेश्वरकडून आलेल्या कळपातील एक गवा चुकून इकडे वास्तव्य करत असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. अजुनही गवारेड्यामुळे नुकसान झाले असावे अशी माहिती पुढे आलेली नाही.
दरम्यान, मागील चार वर्षांमध्ये जिल्ह्यात गवारेड्याचे कळप मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. संगमेश्वर, लांजा तालुक्यासह रत्नागिरीतील खाडीपट्ट्यात गवारेडा दिसत आहे. काही दिवसांपुर्वी चिपळूणमध्ये एका ग्रामस्थावर गवारेड्याने हल्ला केला होता. त्यामुळे शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये गवारेड्याची दहशत निर्माण झाली आहे. चवे येथे आढळलेल्या गव्याचा बंदोबस्त वन विभागाकडून केला जावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.