रत्नागिरीतील ओसवाल नगर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मोठ्या साखळीची शक्यता

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथे एका बंगल्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक पीडित युवती सापडली असून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

ओसवाल नगर येथील एका बंगल्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. बाहेरील जिल्ह्यातून मुली आणून त्यांच्या मार्फत सेक्स रॅकेट सुरू होते. या ठिकाणी रत्नागिरीतील अनेक उच्चभ्रू वस्तीतील लोकांची ये-जा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
 

यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी प्लान आखला. बनावट गिऱ्हाईक तयार करून भेटीची वेळ ठरवण्यात आली. यानुसार गुरुवारी दुपारी सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एक पीडित मुलीची सुटका करण्यात आली आणि सेक्स रॅकेट चालवणाऱ्या पद्मिणबाई तुकाराम बादलवाड (वय ४३ रा.चव्हाणवाडी रोड टेंभूर्णी सोलापूर), शिवाजी आनंदराव पाटील (वय वर्ष ५८ राहणार वारू सिद्धनाथ मंदिराशेजारी तालुका कराड, जिल्हा सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. 

पोलिसांनी धाड बंगल्यावर टाकल्याने एकच खळबळ उडाली असून रत्नागिरी सारख्या शहरात रिकामे बंगले असं वापरत असल्याची  धक्कादायक माहिती बाहेर येत असल्याची चर्चा आहे.