रत्नागिरी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने परियोजना स्त्री मनोरक्षद्वारा एक पहल या कार्यक्रमांतर्गत आयोजित पोस्टर मेकिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या संखी वन स्टॉप केंद्राने देशात दुसरा क्रमांक पटकावला.
जागतिक महिला दिन सप्ताह दिल्ली येथे साजरा करण्यात येत आहे. यामध्ये देशभरातील सर्व सखी वन स्टॉप केंद्रांचे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यात पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये ‘हिंसामुक्त, सुरक्षित आणि लैंगिक समानता असणार्या घरांची संकल्पना’ आणि ‘हिंसेचा सामना करणार्या महिलांना मदत करण्याचे उपाय’ हे दोन मुख्य विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातून ७०४ वन स्टॉप सेंटरनी सहभाग घेतला. त्यामधून सखी वन स्टॉप सेंटर रत्नागिरीतर्फे सादर केलेल्या पोस्टरला देशात दुसरा क्रमांक मिळाला. या पोस्टर मेकिंग स्पर्धेचे पारितोषिक स्वीकारण्यासाठी सखी सेंटरच्या केंद्र प्रशासक श्रीमती अश्विनी पवनकुमार मोरे या उपस्थित होत्या. महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांचा हस्ते पारितोषीक वितरण झाले. यावेळी स्त्री मनोरक्षाचे प्रिन्सिपल इनवेस्टीगेटर डॉ. प्रभा चंद्रा, डॉ. विणा सत्यनारायणन, डॉ. किम्नेइहत वायफेई उपस्थितीत होते.