रत्नागिरी:- शहरातील मुख्य बाजारपेठेत कोरोनाचा फास आवळत चालल्याचे दिसत आहे. एका कुटुंबातील आठ जण पॉझिटिव्ह सापडल्याने आज बाजारपेठेतील व्यापारी, दुकानदार, फळ-भाजी विक्रेते अशा सुमारे 75 जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 5 वाजेपर्यंत 9 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक हॉटेल व्यवसायिकासह काही व्यवसायिक, कामगारांचा समावेश आहे. आणखी काही यामध्ये पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असल्याने शहरवासीय धास्तावले आहेत.
शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. यापूर्वी काही व्यापारी, दुकानदार सापडले होते. काल तर एका कुटुंबातील आठजण पॉझिटिव्ह सापडल्याने प्रशासनाने सर्व दुकानदार, व्यापारी, कामगार आदींची अॅन्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. खाजगीमध्ये ही टेस्ट 1500 रुपयात केली जाते. पण आज प्रशासनने ते या व्यापारी वर्गाला मोफत दिली आहे. तापसणी झाल्यामुळे अहवालानंतर योग्य ती खबरदारी घेता येणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होणार आहे. बाधितांवर वेळीच उपचार होणार आहे. शहरातील राधाकृष्ण मंदिरात आजपासून पाच तारखेपर्यंत तीन दिवस सकाळी दहा ते चार अशा वेळात अॅन्टीजेन टेस्ट होणार आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. भाजी विक्रेते, फळ विक्रेते व्यापारी कपडे व्यवसायिक तसेच विविध दुकानातील मालक, कर्मचारी सगळ्यांसाठी ही टेस्ट प्रशासनाने ठेवलेली आहे. सायंकाळपर्यंत 75 जणांची टेस्ट झाली असन त्यापैकी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत कोरोनाचा वाढता फैलाव चिंतेची बाब आहे.