प्रा. स्वप्नजा मोहीतेंच्या अभ्यास; पर्यटनवाढीच्या संधी
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील अलावा, मिर्या, आरे-वारे, उंडी आणि वायंगणीसह आजुबाजूच्या किनार्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स प्रजातींसह रंगीत मासे आणि स्पॉन्जेसच्या 18 प्रजाती आढळतात. हे प्रा. स्वप्नजा मोहीतेंच्या अभ्यासामधून हे पुढे आले आहे. वन्य जीव संरक्षण कायद्याने प्रवाळांच्या सगळ्या प्रजातींना संरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याने रत्नागिरीतील या प्रवाळांचे संरक्षण करणे सोपे जाणार आहे.
कांदळवन कक्षामार्फत किनार्यांवरील चिपींसह प्रवाळ बेटांच्या संरक्षणासाठी पावले उचलली जात आहेत. या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील ही प्रवाळे संरक्षित करण्याला चालना मिळणार असून पर्यटनालाही त्याचा उपयोग होईल. कोकण किनार्यावर सापडणार्या प्रवाळांबाबत प्रा. मोहीते या गेली सहा वर्षे अभ्यास करत आहेत. त्यांना अनेक प्रवाळं आणि विविध रंगीबेरंगी माशांच्या प्रजात आढळल्या आहेत. रत्नागिरी किनारपट्टीवरही प्रवाळांची बेटे किंवा रीफ्स असंख्य जलचरांच्या सपोर्ट सिस्टिम्स संशोधकांना पहायला मिळतात. रत्नागिरी शहराजवळील अलावा, मिर्या तर तालुक्यात आरे-वारे, उंडी आणि वायंगणी येथे खडकाळ किनार्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स प्रजाती विशेषतः फविआ, हार्ड कोरलच्या पोरिट्स, अक्रोपोरा, मोन्टीपोरा अशा प्रजाती आहेत.
अन्न मिळवण्यासाठी, निवारा किंवा लपण्याच्या जागा, नर्सरी ग्राउंड्स म्हणून अनेक जलचर प्रवाळांच्या बेटांचा आश्रय घेतात. प्रवाळांच्या सोबत वाढणारे स्पॉन्जेस, सागरी शैवाल आणि इतर जीव हे अनेक सागरी अन्न साखळ्यांचे दुवे असतात. किनारपट्टीचा अभ्यास करताना प्रवाळ आणि या सागरी स्पॉन्जेसचा सहसंबंध लक्षात आला. त्याच बरोबर चांदणी मासे, ब्रिटल स्टार, सी अर्चिन, इलिशियासारखे न्यूडिब्रँक्स, मासे, कालवे, शिंपले आणि सागरी शैवालाच्या कॉलरपा, सरगॅसम, पडायना, कोरॅलीना, अँफिरोआ सारख्या कोरलाईन अल्गी, उल्व्हा, ग्रॅसिलॅरिया आणि इतर असंख्य प्रजाती इथे सापडतातच पण त्याच बरोबर खेकडे, समुद्र काकडी, डॅमसेल, सार्जंट मेजर सारखे अनेक रंगीत मासे आणि स्पॉन्जेसच्या 18 प्रजाती इथे सापडल्या आहेत. हे रत्नागिरीच्या किनारपट्टीतील जैवविधततेचे द्योतक आहे आणि म्हणूनच त्याची काळजी, संरक्षण ही काळाची गरज आहे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग किल्ल्यापासून जवळ असणारे आंग्रिया बँक हे बेट आहे. 800 चौ. किमी क्षेत्रफळाच्या या समुद्रात बुडलेल्या बेटाभोवती प्रचंड जैवविविधता आढळली आहे.