रत्नागिरीचा सुपुत्र अनिरुद्ध मयेकर याची ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी:- रत्नागिरीचा सुपुत्र अनिरुद्ध योगेश मयेकर याची ऑल इंग्लंड ओपन 2021 या जागतिक स्तरावरच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय चमूमधून निवड झाली आहे. जागतिक स्तरावर अशी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीकरांची मान अभिमानानं उंचावली आहे. 
 

योनेक्स ऑल इंग्लंड ओपन 2021 ही जागतिक स्तरावरची बॅडमिंटनची स्पर्धा असून ही स्पर्धा 17 मार्च ते 21 मार्च या कालावधीमध्ये बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय संघाची निवड करण्यात आली. या संघामध्ये डॉ. योगेश मयेकर यांचा मुलगा अनिरुद्ध मयेकर यांची भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. मेन्स डबल्स मध्ये जागतिक क्रमवारीत 265 क्रमांकावर असलेल्या तसेच मेन्स डबल्सच्या वर्ल्ड टूर  रँकिंगमध्ये 71 व्या क्रमांकावर असलेल्या वीस वर्षीय अनिरुद्धने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत पाच टूर्नामेंट जिंकल्या आहेत. 
लहानपणापासूनच अनिरुद्धने अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिल्हा, राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या त्याचे वडील आणि आईचं तसेच कुटुंबियांचा पाठबळ त्यांला नेहमीच लाभले आहे.  स्वतःच्या मेहनतीवर आणि कोणत्याही वशिला किंवा पाठिंब्याशिवाय अनिरुद्धने स्वतःच्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर भारतीय टीम मध्ये आपले स्थान मिळवले आहे. 17 मार्चपासून इंग्लंड येथे होत असलेल्या या टूर्नामेंटमध्ये अनिरुद्ध भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.  त्याच्या या निवडीबद्दल रत्नागिरीतील विविध स्तरांमधून त्याचं अभिनंदन केलं जात आहे.