रत्नागिरी:- शहराजवळील एमआयडीसीत अकरा एकर जागेवर उभारण्यात येणारे जिल्हा क्रीडा संकुलाचे काम निधी अभावी रखडले होते; मात्र राज्य शासनाने रत्नागिरीसह चार जिल्ह्यांना 23 कोटी रुपयांच्या निधीचा बुस्टर दिल्याने या कामाला चालना मिळणार आहे. या निधीतून मैदानी खेळासाठी सिंथेटिक ट्रॅक आणि मुलांसाठी वसतीगृह उभारण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सुमारे सात वर्षांपुर्वी भुमिपूजन झालेल्या रत्नागिरीतील जिल्हा क्रीडा संकुलांचे काम निधी अभावी रखडले. अकरा एकरच्या जागेमध्ये कार्यालयासाठी इमारती, चारशे मीटरचा मैदानी खेळांसाठी सिंथेटिक ट्रॅक, बहूउद्देशिय सभागृह, सरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच खो-खो, कबड्डीसह विविध खेळाची मैदाने बनविण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धांसाठी येणार्या खेळाडूंना राहण्यासाठी 50 मुले, 30 मुली राहतील एवढया क्षमतेचे वसतीगृह उभारले जाणार आहे. यासाठी वीस कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे. भुमिपूजन झाले तेव्हा पाच कोटीचा निधी मिळाला होता; मात्र त्यामधून मैदाने, वसतीगृह बनविण्यापेक्षा कार्यालयीन इमारत, ऑल्मिपिंकच्या धर्तीवर आकर्षक भिंत उभारण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे खेळापेक्षाही अन्य सुविधांवर भर दिल्याने हे मैदान प्रत्यक्ष सरावासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. रत्नागिरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी क्रीडांगण हे एकमेव मोठे मैदान आहे. त्या ठिकाणी क्रीकेटसह विविध खेळांचा सराव होतो. खो-खो, कबड्डीच्या स्पर्धांसाठी अनेकवेळा मैदान उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलाच्या उर्वरित कामासाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याला नुकतेच यश आले आहे. रत्नागिरी, पुणे, नांदेड आणि बुलाढाणा या जिल्ह्यांसाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील जास्तीत जास्त निधी रत्नागिरी जिल्ह्याला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संकुल उभारण्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे. जुन्या काळात केलेल्या चुका लक्षात घेता बांधकाम विभाग मैदाने आणि वसतीगृह उभारण्यासाठी प्राधान्य देईल अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.