रत्नागिरी:-गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही खरीप हंगमात खताचा पुरवठा थेट बांधावार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शेतकर्यांना आधार लिंक असलेल्या खात्यावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
कोरोनाचे दूर झालेले सावट आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिणामानंतर खत वितरण प्रणाली सुरळीत झाली असून, यावर्षी विनाव्यत्यय खत पुरवठा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. यासाठी शेेतकर्यांनी खताची नोंदणी आगावू करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
सन 2022 च्या खरीप हंगामासाठी विविध खतांची 22 हजार 146 मे. टनाची मागणी केली असून, शासनाने 14 हजार 640 मे. टन आवंटन मंजूर केले आहे. तसेच 9 हजार 454 क्विंटल बियाण्याची मागणी आहे. यातील मे महिन्यापर्यंत साडेतीन हजार मे. टन खत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु, तुलनेत 21 टक्केच खत आले. सध्या रस्तेमार्गे पुरवठा सुरू असून, रेल्वेद्वारे पुरवठा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गतवर्षी 13 हजार 519 मे. टन खताचा तर 6 हजार 061 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला होता.
यावर्षी पाऊस अपेक्षेपूर्वीच सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे भात पेरण्यांना लवकर प्रारंभ होईल. त्या आधी खते शेतकर्यांपर्यंत पोचण्याचे नियोजन कृषी विभगाने केले आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे खतांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्यांना वेळेत मागणी नोंदवण्याचे आवाहन महिन्याभरापूर्वी करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही झाली आहे. विविध कार्यकारी संस्थांतर्फे खतांची मागणी करण्यात आली होती. रत्नागिरी, दापोली, लांजा, राजापूर, चिपळुणातील संस्थांना खताचा पुरवठाही झाला आहे. उर्वरित खताचाही पुरवठा लवकरच होणार असून, यावर्षीही खतांचा पुरवठा शेतकर्यांना थेट बांधावर करण्यात येणार आहे.