रत्नागिरी:- जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी प्रत्यक्षात पावसाळ्यात सुरूवात झालेली नाही. उष्म्याने अंगाची लाहीलाही होत असताना नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. अशातच रत्नागिरीतील सर्वात बुजूर्ग करबुडे शितपवाडी येथील 98 वर्षीय शेतकरी गंगाराम शितप यांनी 20 वर्षानंतर पुन्हा एकदा यावर्षी दुष्काळ पडण्याचे भाकित केले आहे. त्यांनी आपल्या खास शैलीत यावर्षीच्या पावसाळ्याचे वर्णन केले आहे. त्यांचा हाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे शितपवाडी येथील शेतकरी गंगाराम शितप (वय 98) हे आजही शेतात काम करतात. आज 21व्या शतकातही गंगाराम शितप आपल्या पूर्वीच्या शेतकरी वेशातच गावात वावरतात. गेल्या 98 वर्षांचा अनुभव, निसर्गाचा अंदाज बांधणाऱ्या गंगाराम शितप यांनी 2002 नंतर यावर्षी दुष्काळ पडण्याचे भाकित केले आहे.
ते म्हणतात, पाऊस नाही पेरे करायचे कशाला? माझ्या उमेदीच्या काळात मे महिन्यातच पेरे व्हायचे. रोहिणी नक्षत्रात पाऊस पडायचाच. चांगली रोपे याची त्यामुळे वेळेवर शेती होत होती. गणपतीत भात कापायची वेळ येत असे. परंतु आता निसर्गाचे चित्र पूर्णतः बदलले आहे. यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पूर्ण मोसमात पाऊस कमीच आहे. मिरग, अरदडात थोडा पाऊस पडले. पुढील नक्षत्र अशीच जातील. म्हातारा थोडा लागेल, परंतु शेतीसाठी पुरेसे पाणी यावर्षी मिळणार नाही असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
यावर्षी पावसाची वाट पाहावी लागते. पाऊस आल्याशिवाय पेरणी करू शकत नाही. त्यामुळे निसर्गावरच आमचं पोट अवलंबून आहे. माझा अनेक वर्षांचा अनुभव खरा ठरेल असा विश्वास गंगाराम शितप यांनी व्यक्त केला आहे.