यंदादेखील शिक्षक बदल्यांना मुहूर्त कठीणच?

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहाय्यकांसह अन्य पदांच्या बदल्यांची प्रक्रिया 10 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यामधून शिक्षकांच्या बदल्या वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत अशी शक्यता आहे. कोरोनापाठोपाठ अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत असल्याने बदल्यांसाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात अजुन अडथळेच आहेत.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या नियम आणि निकषांच्या अडथळ्यात दरवर्षी वादग्रस्त ठरतात. यावर्षी राज्य शासनाने शिक्षक बदल्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार सुगम आणि दुर्गम भागातील शाळांची यादी तयार करण्याच्या सुचना दिल्या. ती यादी बदलीसाठी नव्याने विकसित केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन भरावयाची होती. दुर्गम शाळांचे निकषही निश्‍चित केले असून त्याची माहिती गोळा करण्याचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीत सुरु होते; परंतु अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच भाग प्रभावित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. बदल्यांसंदर्भात शासनाकडून सामान्य प्रशासनाला नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. त्यामध्ये शिक्षक वगळून अन्य सर्व पदांच्या बदलीची जिल्हांतर्गत प्रक्रिया 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना आहेत. शिक्षकांना वगळण्यात आल्याने सध्यातरी बदल्यांचा विषय लांबणीवर पडला आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी ग्राम विकास विभागाचे परिपत्रक प्रमाण मानले जाते. बदल्या करण्याविषयी तिकडूनही कोणतेच आदेश आलेले नाहीत. सध्याच्या स्थितीत प्रत्यक्ष अध्यापन सुरु नाही. त्यामुळे अनेक शिक्षक ऑनलाईन अभ्यासक्रमासह सोशल मिडियाच्या माध्यमातून शिकवण्या सुरु आहेत. दुर्गम भागात विद्यार्थ्यांना ऑफलाईन अभ्यासक्रम शिकवण्याचा काही शिक्षक प्रयत्न करत आहेत. गतवर्षी कोरोनामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदाही निकष ठरविण्यासाठी उशिर झाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली होती. आता या बदल्यांवर रद्दची टांगती तलवार निर्माण झालेली आहे. बदल्या न झाल्यामुळे अन्य तालुक्यात गेलेल्या शिक्षकांची अडचण झाली आहे.