यंदाच्या हंगामात कॅनिंगला हापूस दुरापास्त

रत्नागिरी:- बदललेल्या वातावरणाने आंब्याचा चालू हंगाम खडतर झाला आहे. उत्पादन कमी असल्याने यंदाच्या हंगामात कोकणातून प्रक्रिया उद्योगाला पुरेसा आंबा मिळण्याची शक्यता कमीच आहे. यंदा आंबा उत्पादन केवळ ३० टक्के असल्याने फळबाजारातील दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात आंब्याचा कॅनिंगकडे होणारा प्रवास रोडावण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम कॅनिंग व्यावसायिकांना बसणार असून,
अन्य प्रक्रिया उद्योगाची वाटही बिकट होणार आहे. त्यामुळे आंब्यापासून बनवल्या जाणार्‍या उत्पादनांचे दरही चढे राहण्याची शक्यता आहे.

हापूस हंगामात प्रक्रिया उद्योगासाठी कॅनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कॅनिंगसाठी थेट बागायतदारांच्या बागेतूनच आंबा गोळा केला जातो. तर काहीवेळा बागायतदार स्वतः व्यावसायिकांकडे आंबा घेऊन येतात. यंदा हापूस हंगाम विविध समस्यांमधून खडतर वाटचाल करीत आहे. अनेक अडथळे पार करीत आंबा फळबाजारात पोहचत आहे. मुंबईसह राज्यातील अन्य बाजारपेठांमध्ये आंबा विकण्यास सुरुवात होत आहे. स्थानिक पातळीवरही आंबा विक्रीस येऊ लागला आहे. मात्र, तुलनेत यंदा हापूसचे उत्पादन कमी असल्याने सुरूवातीपासूनच आंब्याचे बाजारातील दर स्थिर असल्याचे चित्र आहे. काही बागायतदारांकडील आंबा आता अखेरच्या टप्यात आला आहे. त्यामुळे हंगामाची खरी सुरूवात होत असतानाच आता आंबा कमी पडू लागला आहे. एकूणच उत्पादन कमी झाल्यास व्यापारी नियमाप्रमाणे त्याचे दरही चढे राहतात. अजूनही बाजारात हापूसचा दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा आहे. मुबलक आंबा झाला आणि फळबाजारातील दर घसरले की आपोआपच प्रक्रिया उद्योगाकडे आंबा वळतो असे सर्वसाधारण चित्र असते. अजून स्थानिक पातळीवर आंबा कॅनिंग व्यवसायाला म्हणावी तशी सुरूवात झालेली नाही.

फळबाजारात आंबा जात असल्याने आणि त्याठिकाणी दरही टिकून असल्याने प्रक्रिया व्यवसायाची चाहूल अद्याप लागलेली नाही. प्रतवारी करून उरलेला तसेच डागी आंबा कॅनिंगला दिला जातो. कॅनिंग व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होण्यासही मदत होते. मात्र, अजून कॅनिंग व्यवसाय अपेक्षेप्रमाणे सुरू झालेला नाही. आंबा उत्पादन कमी झाल्याने यंदा कॅनिंग व्यवसाय उशीरा सुरू होणार असून, हा व्यवसायही यंदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही बागायतदारांकडे आंबा उत्पादन बर्‍यापैकी आहे तर काहींकडे प्रमाण कमी आहे. आंबा उत्पादनाचे व्यस्त प्रमाण असल्याने बाजाराची नेमकी स्थिती काय राहील याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे.

सध्या हंगामात थोडा खंड पडला आहे. पहिल्या टप्यातील आंबा फळबाजारात गेल्यानंतर आता आंबा काढणी मंदावली आहे. अजून बागांमध्ये झाडांवर आंबा आहे. मात्र, आंबा तयार होण्यासाठी काही कालावधी जाईल, असे चित्र आहे. अखेरच्या टप्यातील आंबा बाजारात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात येईल, अशी शक्यता आहे. त्यावेळी बाजारातील दरानुसार कॅनिंग व्यवसायाची स्थिती लक्षात
येईल. बाजारात आंब्याला चांगला दर मिळत राहिल्यास प्रक्रिया उद्योगाकडे आंबा कमी वळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कॅनिंगचा दरही
अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागणीप्रमाणे प्रक्रिया उद्योगाला आंबा कमी पडल्यास पर्यायाने प्रक्रिया उत्पादनाच्या किंमतीही वधारती, अशी शक्यता आहे.

आंबा उत्पादन अधिक झाल्यास स्थानिक पातळीवर अनेक कुटुंबे आंब्यापासून विविध उत्पादने बनवतात. यामध्ये लोणची, जाम, पल्प, वडी आदी विविध उत्पादनांचा समावेश होतो. छोटे छोटे व्यवसायिक यातून आपला चरितार्थ चालवतात. मात्र, यंदा हापूसचे उत्पादन कमी झाल्याने याचा थेट परिणाम अशा प्रक्रिया उद्योगांना जाणवणार आहे. यातून प्रक्रिया उत्पादनांच्या किंमती वाढू शकतात अशी माहिती रत्नागिरीतील प्रक्रिया उद्योजक आराध्य वैती यांनी दिली.