यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता

रत्नागिरी:- जेमतेम सरासरीगाठेल एवढा पढलेला पाऊस आणि वाढतचे तापमान यामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट झाली आहे. जानेवारी महिन्यातील तपासण्यात आलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. अद्यापही तीन महिने उन्हाळा आहे. थंडीची प्रतिक्ष सुरू असताना वाढत्या तापमानाने जलस्तरातही बदल घडत आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पाहणीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या जलस्तरात 0.09 मीटरने घट झाली आहे.

भूजल विभागाकडून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर अशी चारवेळा पाणीपातळी तपासली जाते. त्यासाठी जिल्ह्यातील 63 विहिरी निश्चित केलेल्या आहेत. पाणी पातळीच्या नोंदी घेतल्यानंतर मागील पाच वर्षांच्या पातळीशी तुलना सरासरी काढली जाते. त्यावरून टंचाई तीव्रतेचा अंदाज बांधला जातो. या पाहणी अंतर्गत बहुतांश तालुक्यात भूजल पातळीत घट झालेली दिसते.

पाऊस लांबला असला तरीही ऑक्टोबर महिन्यात तीव्रता कमी झाली. त्याबरोबरच थंडीचा कालावधीही कमी राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन, पाणी वेगाने जमिनीत मुरणे यासारखे प्रकार यंदा घडले आहेत.
पावसावरच पाणीसाठे अवलंबून असतात तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसाही वाढला आहे. नदीकिनारी परिसरातील विहिरींचे पाणी अजूनही स्थिर आहे. उन्हाळा तीव्र असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे. आताच अनेक विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.
दरम्यान, गतवर्षी जानेवारी महिन्यात घेतलेल्या नोंदीमध्ये खेड, गुहागर, संगमेश्वर आणि लांजा या तालुक्यातील पाणीपातळी घट होती. यंदा राजापूर वगळता सर्वच तालुक्यातील पातळी कमी झालेली आहे.