रत्नागिरी:- मोहोळ तालुक्यातील अनगर येथे एका दुमजली जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून ३८ जणांना पकडले. या कारवाईत रोख रकमेसह महागड्या मोटारी आणि किंमती स्मार्टफोन असा मिळून एक कोटी ३ लाख ६९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत गुजरातेतील सुरत शहरासह रत्नागिरी, बीड आदी दूरच्या भागातून आलेले अनेक बडे व्यापारी व उद्योजक जुगार खेळताना सापडले.
संपूर्ण मोहोळ तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या अनगर भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांचा वर्षानुवर्षे मोठा दरारा राहिला आहे. याच गावात लोकनेते पॕलेस नावाच्या इमारतीत तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांना मिळाली होती. त्यानुसार खात्री करून त्यांनी तेथे पोलिसांच्या विशेष पथकाला सोबत नेऊन धाड टाकली. तेव्हा इमारतीच्या दोन्ही मजल्यांमध्ये जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले.
या धाडीत अबरार करीम फकीर (रा. चिंचनाका, चिपळूण, जि. रत्नागिरी), रियाज बाशू मुजावर, दीपक गायकवाड (रा. मोहोळ), विनायक नीलकंठ ताकभाते, मनोज नेताजी सलगर, स्वप्नील कोटा, रोनक नवनीत मर्दा, हर्षल राजेंद्र सारडा, कृष्णा अर्जुन काळे (रा. सोलापूर), ओंकार विजय चव्हाण, फारूख याकूब शेख (रा. सुरत, गुजरात), एकनाथ भगवान चांगिरे (रा. परळी वैजनाथ, जि. बीड), विलास धर्मराज कडेकर (रा. बडवणी, बीड), नितीन गुंड (रा. अनगर) आदी मिळून ३९ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन लाख २६ हजार रूपये रोकडसह महिंद्रा थार, महिंद्रा एक्सयूव्ही, स्विफ्ट डिझायर, फोक्स वॕगन आदी सहा महागड्या मोटारी आणि ४० स्मार्टफोन संच असा एकूण एक कोटी ३ लाख ७९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.