मोदी सरकारचा गैरकारभार जनतेपर्यंत पोहचवणार: अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे

रत्नागिरी:- महागाई, इंधन दरवाढ, ईडीसह सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्‍या मोदी सरकारची लक्तरे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काँग्रेसचा जनजागरण सप्ताहाला सुरवात झाली आहे. या निमित्ताने काँग्रेसची सभासद नोंदणीही होणार असून प्रत्येक बुथवर 25 क्रियाशील सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात बोलताना ते म्हणाले की, सरकार आल्यानंतर 2014 जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासनं आणि 2021 ला असलेल्या परिस्थितीचे गांभिर्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्यासाठी काँग्रेसने जागरण पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत त्याचा आरंभ झाला असून रत्नागिरी रविवारी (ता. 14) औपचारीक कार्यक्रम घेण्यात आला आहे. हा पंधरवडा 29 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष बुधवरील कार्यकर्त्यांना याबाबत मार्गदर्शन करतील. क्रियाशिल कार्यकर्ते सामान्यांपर्यंत मोदी सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोचवतील अशी रचना केली आहे. या निमित्ताने काँग्रेस सभासद नोंदणीही केली आहे. जिल्ह्यात 1 हजार 719 बुथ असून प्रत्येक ठिकाणी पंचवीस क्रीयाशिल कार्यकर्त्यांची नोंद केली जाणार आहे. काँग्रेसच्या मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एसटी आंदोलनाविषयी श्री. घोरपडे म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन चुकीच्या पध्दतीने होत आहे. हेकेखोरपणा सुरु असून विरोधक त्याला खतपाणी घालत आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा एका दिवसात होणारा नाही. त्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. मात्र भाजपकडून त्यांना फितवले जात आहे. त्यांनी सरकारने सांगितलेले समजून घेतले पाहीजे.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, सहप्रभारी श्रीकृष्ण सांगळे, प्रदीप जाधव, दिपक राऊत, कपिल नागवेकर आदी उपस्थित होते.