मैत्रिणीचा हात धरल्याच्या कारणावरून हाणामारी; १६ जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मैत्रिणीचा हात धरल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर तुफान हाणामारीत होऊन एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली . हा प्रकार रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयालगत पोस्टाच्या गल्लीत घडला .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये संतोष सीताराम शिंदे ( वय ५० , रा . नाचणे , विश्वनगर , रत्नागिरी ) हे जखमी झाले आहेत . या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून , सुमारे १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ओम गणेश नागवेकर ( वय २० ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या मैत्रिणीचा हात अजिंक्य शिंदे याने धरल्याने ओमने त्याला विचारणा केली . अजिंक्यने आपल्या आई- वडिलांना याबाबत माहिती दिली . त्यानंतर अजिंक्यचे वडील संतोष शिंदे , त्याची आई आणि अन्य दोन व्यक्ती महाविद्यालयात विचारण्यासाठी गेले . यावेळी चौघांनी ओमला शिवीगाळ करून मारहाण केली . याप्रकरणी पोलिसांनी गैरकायदा जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे . याप्रकरणी दुसरी फिर्याद संतोष सीताराम शिंदे यांनी दिली आहे . त्यानुसार त्यांचा मुलगा अजिंक्य आणि ओम नागवेकर यांच्यामध्ये वाद झाला होता . याबाबत ओमला विचारण्यासाठी गेले होते . त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली . त्यानंतर त्याचा मामा झापडेकर ( पूर्ण नाव माहीत नाही . ) याने संतोष शिंदे यांना ओढत पोस्टाच्या गल्लीत नेत लोखंडी वस्तूने डाव्या डोळ्याजवळ मारहाण केली . त्यानंतर ओम नागवेकर , त्याचे वडील गणेश नागवेकर यांच्यासह ७ ते ८ जणांनी मारहाण केली . यावेळी संतोष शिंदे यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेली असता , त्यांना मारहाण करण्यात आली . या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास पोलिस करीत आहेत .