13 हजार 761 पॉझिटिव्ह, एप्रिलच्या तुलनेत अडीच हजार अधिक रुग्ण
रत्नागिरी:- कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव अजुनही रत्नागिरी जिल्ह्यावर आहे. एप्रिलपेक्षा मे महिन्यात अडीच हजार अधिक कोरोना बाधित सापडले. मागील महिन्यात 11 हजार तर मे महिन्यात हा आकडा 13 हजार 761 वर पोचला. जुन महिन्यात ही लाट ओसरेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव कोकणात सुरु झाला. शिमगोत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे, सभा-समारंभांमुळे एकमेकांशी वाढलेला संपर्कातून गावागावात कोरोनाने हात पाय पसरण्यास सुरवात केली. शासनाकडून संचारबंदी लागू केल्यानंतरही कोरोना रुग्णांची वाढ सुरुच आहे. दोन महिन्याहून अधिक काळ लोटला तरीही कोरोनाचे बाधित कमी होत नसल्याने आरोग्य विभाग हतबल होत आहे. मार्च महिन्यात रुग्णांचा आकडा कमी होता. आतापर्यंतच्या चौदा महिन्यात जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा 36 हजार 044 झाला आहे. त्यातील एप्रिल महिन्यात 11 हजार बाधित सापडले होते. चारशेच्या सरासरीने हे रुग्ण आढळत होते. संचारबंदीमुळे मे महिन्यात हे प्रमाण कमी होईल अशी शक्यता होती; परंतु ती फोल ठरली. संचारबंदी असतानाही रुग्णांचा आकडा वाढत आहे. मे महिन्यात 13 हजार 761 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात अधिक नोंद झाली आहे. शहरी भागांपेक्षाही ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांना कोरोनाचे लक्ष्य होत आहेत. राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा क्रमांक बाधित सापडण्यात अव्वल आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला आहे. माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम राबवूनही त्यात फरक पडलेला नाही. मे महिन्यात रुग्ण सापडण्याचे सरासरी प्रमाण साडेचार दररोज आहे. या काळात पावणेसातशे रुग्ण एकाच दिवशी आढळण्याचा उच्चांक झाला आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशन बंदचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सुचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत; परंतु ग्रामीण भागात चाचण्यांसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार आहेत. कोरोना नियंत्रणासाठी करत असलेल्या उपायोजनाचा आराखडा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रविवारी (ता. 30) मुख्यमंत्र्यांपुढे ऑनलाईन कार्यक्रमात मांडला. तसेच वाडी-वस्तीवरील डॉक्टर्स्ना मार्गदर्शन करुन कोरोनावरील उपचारांची साखळी निर्माण करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत.