मेर्वीत दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद 

रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथे मागील अनेक कालावधीपासून दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातच बिबट्या फसला आहे. बिबट्या पकडला गेल्याने गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

पावस, मेर्वी या परिसरात सागरी मार्गावर गेली दोन वर्षे सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत. हल्ले झाल्यानंतर तातडीने वनविभागाला कळविले जात  होते मात्र बिबट्या पकडण्यात अपयशच येत होते. या परिसरात वनविभागातर्फे गस्त सुरू होती. मात्र  बिबट्या आपला मार्ग बदलून गावदरीतून भ्रमण करीत असताना दिसून आला होता. रेस्क्यू टीमचे कॅमेरे व पिंजरे लावला की बिबट्या कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्याला पकडण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने गावात भीतीचे वातावरण होते.

 गुरुवारी सकाळी अखेर बिबट्या पिंजऱ्यात फसल्याचे निदर्शनाला आले. गावातील ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकारी प्रियांका लगड यांना दिली. लगड या तत्काळ मेर्वीकडे रवाना झाल्या आहेत.