मृत महिलेच्या बांगड्या लांबविणाऱ्या ‘त्या’ महिलेवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या वृद्धेच्या हातांमधील सोन्याच्या ८८ हजार रुपये किमतीच्या बांगड्या लांबविणाऱ्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडली होती. 

स्मिता प्रफुल्ल सावंत (३२, रा. पाली, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. या बाबत मृत सुलोचना पाटील यांची नात समीक्षा पाटील हिने अर्जाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांच्याकडे तक्रार दिली होती. या प्रकरणी तिला निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी आता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.