रत्नागिरी:- मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका राजापूर तालुक्याला बसला आहे. रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सोमवारी सकाळी 7.30 च्या दरम्याने एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.
मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसऱ्यांदा शहराला वेढा घातला आहे. रविवारी रात्री उशिरा जवाहर चौकामध्ये धडक देणाऱ्या पुराच्या पाण्याने सोमवारी सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासाहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे. संततधारा पावसाने पूरस्थितीमध्ये वाढ होत असून, शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या पुराच्या पाण्याने व्यापाऱ्यांपुढे स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी माहिती देताना सांगितले की, पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एकजण वाहून गेला असून, त्याचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान तालुक्यातील जवळच्या सर्व गावांत कोणी बेपत्ता असल्यास तत्काळ माहिती पोलीस स्थानकावर द्यावी , असे आवाहन करण्यात आले आहे .