मुसळधार पावसाने रत्नागिरीत अनेक ठिकाणी भूस्खलन

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील गोळप, शिळ-मिरजोळे येथे भूस्खलन झाले असून वेतोशी येथे नदीकिनारी असलेल्या घराची पडवी खचली आहे. तेथील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ६८ मि.मी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ७०७ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला. याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी तालुक्याला बसला आहे. वाटद येथील अनंत तुळाजी मांजरेकर यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यांचे शेजारी असलेल्या संदेश चंद्रकांत मांजरेकर यांच्या घरी स्थलांतर करण्यात आले. तसेच वेतोशी येथील शारदा केशव रेवाळे यांच्या घराची पडवी खचली. त्यांचे घर नदीकिनारी असल्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
काही भाग दरवर्षी खचतोय.

गोळप येथे ओढ्याजवळील भाग खचल्यामुळे तीन कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शिळ-मिरजोळे येथील काही भाग दरवर्षी पावसाळ्यात खचत आहे. राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथे १२ जुलैला नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या सहदेव खेमाजी सोंड्ये यांचा मृतदेह सापडला आहे.

भूस्खलन झालेल्या घटनास्थळाची पाहणी
शिळ धरणाजवळील डोंगराचा काही भाग पावसामुळे कोसळला आहे. त्यामुळे शिळ येथील गावच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता भूस्खलनामुळे नष्ट झाला आहे. संरक्षक भिंत कोसळली आहे. या परिसरातील बागायत, कलमे, शेतीचेही नुकसान झाले आहे. जमीन खचण्याचा प्रकार सातत्याने सुरू राहिला तर सध्या भूस्खलन झालेल्या भागापासून काही अंतरावर असलेल्या घरांना धोका पोचण्याची शक्यता आहे. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह कृषी अधिकारी, सरपंच संदीप नाचणकर, उपसरपंच राहुल पवार यांच्यासह सदस्यांनी भूस्खलन झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली.