मुसळधार पावसाने दाणादाण; रस्ते-रेल्वे वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने दणादण उडवली असून ठिकठिकांणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला आलेल्या पुराणे चांदेराई, टेबेपूल, सोमेश्वर, पोमेंडी गावे बाधित झाली आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर आले असून वाहतूक ठप्प झाली आहे. चांदेराई पुलावरून पाणी वाहत आहे. हरचेरी – चांदेराई मार्गांवर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे. टेंबेपुल येथील जुन्या पुलावरून पाणी जात आहे. रत्नागिरी शहरात काही ठिकाणी पाणी भरले आहे. चिपळूण, खेर्डीला पुराचा विळखा पडला आहे. पावसाचा जोर असल्याने नद्यांचे पाणी वाढते आहे. मुंबई-गोवा तसेच चिपळूण कराड रोड पाण्याखाली गेला आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वरला पूरस्थिती असून नावडी रामपेठमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा महामार्गवरील बावनदी पुलपर्यंत पाणी आल्यामुळे निवळी घाटात गाड्या थांबवल्या आहेत. काही काळ या मार्गावर वाहतूक ठप्प झाली असून संगमेश्वर बाजारपेठेत पाणी घुसले आहे. इकडे खेडमध्येही जगबुडी नदीला पुर आल्याने पाणी शहरात शिरले आहे. संगमेश्वर बाजारपेठेत आणि रामपेठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. मारुती मंदिर, देवरुख मार्गावर पाणी चढण्याची शक्यता आहे. चिपळुणात काही भागांत 2005 साली आलेल्या पुरापेक्षा अधिक पाणी आले आहे. अनेक लोक घरात अडकले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथे अनेक घरात आणि दुकानात पाणी शिरले आहे. पुराची शक्यता असल्यामुळे दुकानातील साहित्य व्यापाऱ्यांनी आधीच सुरक्षित ठिकाणी हलवले होते. अनेक कुटुंबाना स्थलांतरीत करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील बावनदीवरील छोटा पुल वाहुन गेल्याने निवधे गावचा संपर्क तूटला आहे.