मुसळधार पावसाने काजळी नदीची पाणी पातळी वाढली; चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरण्याचा धोका

रत्नागिरी:- रात्रीपासून तुफान कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा आहे.

पावसाने अनेक गावांना दणका द्यायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. सोमवारी सायंकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे चांदेराई येथील नदीचे पाणी ओसरले होते. मात्र मंगळवारी पहाटेपासून पावसचा जोर वाढत असल्याने पुन्हा एकदा चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरू लागले आहे.

भरतीच्या वेळी देखील पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. चांदेराई बाजारपेठेतील रस्त्यावर आता पाणी आल्याने रत्नागिरी देवधे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.