मुळे काढायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

लांजा:- नदीतील मुळे शोधण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा नदीपात्रातील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास आंजणारी येथील काजळी नदीत घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आंजणारी नांदिवली गावच्या सीमेवर राहणारे प्रमोद नारायण शिंदे (२५ ) आणि मनीष नारायण शिंदे (२२ ) हे शनिवारी दुपारी ४.३० वाजता काजळी नदीवर मुळे शोधण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्याचे मामा पांडुरंग धोंडू शिंदे आणि बहीण कल्याणी दिनेश पडियार हे देखील होते. दुपारी ३.३० च्या सुमारास प्रमोद शिंदे आणि मनीष शिंदे हे दोघे भाऊ मुळे शोधण्यासाठी काजळी नदीपात्रातील खोल डोहाच्या ठिकाणी उतरले. मात्र खोल डोहात गेल्यानंतर यातील मनीष शिंदे हा डोहात बुडाला. तर लहान भाऊ मनीष हा डोहात बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रमोद हा त्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेला. मात्र दुर्दैवाने तो देखील डोहात बुडाला. आपले दोन्ही भाचे डोहात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर मामा पांडुरंग शिंदे यांनी आरडाओरडा केला. मात्र दुर्दैवाने दोन्ही भाऊ नदीतील खोल डोहात बुडाले होते.

ही घटना आंजणारी आणि वेरळ गावच्या सीमेवर असणाऱ्या वेरळ स्मशानभूमी नजीक काजळी नदीत घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. लांजा पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर डोहात बुडालेल्या दोघा भावांचा शोध घेण्यासाठी वेरळ येथील वसंत गजबार आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी नदीपात्रात उतरले. डोहात शोधाशोध केल्यानंतर दोन्ही भाऊ डोहातील चिखलात रुतलेला अवस्थेत आढळून आले. दोन्ही भावांचे मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, दोन्ही सख्ख्या भावांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याने आंजनारी व नांदिवली गावातून हळहळ व्यक्त होत आहे.